{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

म्होरक्या रिव्ह्यू – चुकवू नये असा सिनेमॅटिक अनुभव

Release Date: 14 Jan 2018 / Rated: U / 02hr 03min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suparna Thombare

पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अमर भरत देवकर यांनी प्रत्येक शॉट, संवाद आणि दृश्य अत्यंत काळजीने शूट करत, उत्तम रंगसंगती आणि स्ट्रोक्स सहित एक सुंदर चित्र उभं केलय.

चित्रपटाच्या अनेक उत्तम दृश्यांपैकी एका दृश्यात एक गरीब छोटा मुलगा आणि गावातील एक दाढीवाला वेडा माणूस एका बुजगावण्यासमोर मार्चिंग परेड करताना दिसतात. दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने वाळीत टाकण्यात आलंय. त्यामुळे हे दृश्य अधिक अंगावर येतं.

आणखी एका दृश्यात हाच माणूस त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या मित्राला विचारतो हरीण त्यांचा कळप प्रमुख कसा निवडतात, वेडा म्हणजे काय आणि म्हाताऱ्या माणसाला गोमतर नाव का ठेवलंय, असे एक ना अनेक प्रश्न विचारतो, ज्यात हास्य, मनोरंजन आणि अंतर्मुख करणारे तत्वज्ञान असं बरंच काही एकाच दृश्यात अनुभवायला मिळतं.

पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अमर भरत देवकर यांनी प्रत्येक शॉट, संवाद आणि दृश्य अत्यंत काळजीने शूट करत, उत्तम रंगसंगती आणि स्ट्रोक्स सहित एक सुंदर चित्र उभं केलंय.

१४ वर्षांच्या अशोक (रमण देवकर) याला शाळेच्या २६ जानेवारीच्या परेडचं नेतृत्व करायचंय. हेड मास्तरांना त्याला हि संधी द्यायची आहे, पण त्याचे वर्ग मित्र त्याला सरावाला येऊ देत नाहीत.

अशोक निराश आहे, पण म्हातारा गोमतर आणि येड्या अन्या (अमर भरत देवकर स्वतः) मुळे त्याला पुन्हा प्रयत्न करण्याचे बळ मिळते. येड्या अन्या एक्स आर्मी मॅन आहे, मात्र आता मानसिक स्थैर्य गमावलेला वेडा म्हणून जगतोय. गावाने त्याला पळपुटा म्हणून वाळीत टाकलंय.

सगळ्या अडथळ्यांवर मात करत अशोक परेडसाठी तयारी करतो. परेडचा लीडर ठरवण्याच्या दिवसाची तो वाट बघतोय.

चित्रपटाचा शेवट हृदय द्रावक असला तरी त्यात आशावाद कायम राहतो. अशोकला हे कळतं कि लीडर बनण्यासाठी काय आवश्यक असतं आणि यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक असतं.

म्होरक्याच्या कथासूत्रात अनेक महत्वपूर्ण गोष्टी खुबीने पेरलेल्या आहेत. हे करत असताना चित्रपट आपल्याला हसवतो, हृदयाला स्पर्श करतो आणि आपलं मनोरंजन सुद्धा करतो. यातून हे सुद्धा कळत जातं कि जेव्हा एखादी व्यवस्था तरुण पिढीला सुरुवातीपासूनच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवते, तेव्हा त्यांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं.

शेवटाकडे एका दृश्यात अशोकच्या हातात ड्रम आहे आणि तो स्थानिक आमदाराकडे बघतोय, ज्याच्या मागे मोठा ताफा आहे आणि त्याचे कार्यकर्ते त्याच्या नावाचा घोष करताहेत.

धनगर मुलगा आपल्या मेंढ्याना घेऊन जिथे उत्तम नेतृत्व करताना दिसतो, तिथे माणसांचं नेतृत्व करताना त्याला जवळ जवळ ते अश्यकच होईल असं वातावरण उभं राहतं. अशा प्रसंगामधून उत्तमरीत्या तिरकस भाष्य करण्यात आलंय. माणसांच्या दुनियेत लीडर मेरिट वर नाही तर इतर मार्गांची साथ घेत ठरवला जातो, हे हि इथे अधोरेखित केले जाते.

म्होरक्या खरं तर स्वप्नाची वास्तविक गोष्ट आहे, ज्यामध्ये मुख्य पात्राच्या संघर्षावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करण्यात आलंय.

हि पात्रं चित्रपट बघून बाहेर पडल्यावर सुद्धा आपल्या मनात रेंगाळत राहतात आणि त्यांच्या गोष्टी बघण्याची इच्छा मनात घोळत राहते. म्होरक्या टीव्ही किंवा वेब-सिरीजच्या माध्यमातून अधिक मोठ्या अवधीमध्ये बघायला मिळाला तर या गोष्टीचे अनेक पदर अनुभवायला मिळतील.

अशोकची मूक आई आणि खूब बोलणारी आजी, त्याचा मित्र आणि मार्गदर्शक गोमतर, मेंटॉर येड्या अन्या, असे प्रत्येक पात्र उत्तम रीतीने लिहिले गेले आहे आणि त्यांना तितक्याच बारकाईने सादर केलं गेलं आहे.

सिनेमॅटोग्राफर गिरीश आर जांभळीकर यांनी गावाच्या पार्श्वभूमीचा पुरेपूर वापर केलाय. मावळतीच्या प्रकाशात अशोक मेंढ्यांच्या कळपासोबत टेकडीवर फिरतोय, तसेच एके क्षणी येड्या अन्या सिंहासनावर आरूढ शिवाजी महारांजासारखा दिसणं, असे काही दृश्य आणि उत्तम फ्रेम्स आपल्याला चित्रपटभर बघायला मिळतात. कधी फांद्यांमागे कॅमेरा ठेऊन तर कधी पाण्यातून बाहेर निघणारी मुंगी दाखवत अमर भरत देवकर यांच्या सादरीकरणाला त्यांनी एक वेगळा परिमाण मिळवून दिलाय.

म्होरक्या हा सिनेमॅटिक अनुभव आहे जो बघून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. तेव्हा या परेडचा आनंद घ्या, इथे तिरकस शैलीतले सामाजिक-राजकीय भाष्य दिसेल आणि जगण्याचे काही महत्वपूर्ण धडे सुद्धा बघायला मिळतील.

Related topics

Pune International Film Festival

You might also like