Review Hindi

कलंक रिव्ह्यू – फाळणीपूर्व काळात घडणारी गोष्ट

Release Date: 17 Apr 2019 / Rated: U/A / 02hr 48min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Sonal Pandya

मोठी स्टार कास्ट असून सुद्धा (वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित) अभिषेक वर्मन लिखित-दिग्दर्शित कलंक आपली निराशाच करतो.

एकीकडे रावणदहन चालू असताना आलिया भट्ट ने साकारलेली रूप आणि वरुण धवन ने साकारलेला जफर यांची भेट, भव्यदिव्य हवेलीत झोपाळ्यावर झुलणारी माधुरी दीक्षित यांची बहार बेगम अशी मनमोहक दृश्य अभिषेक वर्मन यांच्या या चित्रपटात दिसतात. बिनोद प्रधान यांनी ही मनमोहक दृश्ये तितक्याच कल्पकतेने आपल्या कॅमेरात पकडली आहेत. इतकी बहुढंगी पात्र असून सुद्धा जेव्हा चित्रपट आपली निराशा करतो तेव्हा प्रेक्षक म्हणून आपल्याला आणखी वाईट वाटते.

भारत-पाक फाळणीपूर्वी लाहोरच्या जवळ असलेल्या हुस्नबाद शहरात ही घटना घडते. सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा) रूपला घरी घेऊन येते आणि आपला नवरा देव (आदित्य रॉय कपूर) शी तिचे लग्न लावून देते. सत्याला प्रदीर्घ आजाराने ग्रासले आहे आणि तिच्या मृत्यूनंतर देवची काळजी घेण्यासाठी सत्या त्या दोघांचे लग्न लावून देते.

बलराज चौधरी (पाहुण्या भूमिकेत संजय दत्त) आणि देव चौधरी डेली टाइम्स नावाचे वर्तमानपत्र चालवतात. त्यांचे घराणे गर्भश्रीमंत आहे. लंडन वरून परतलेल्या देवला आपल्या शहरात स्टीलची निर्मिती करायची आहे, पण त्यामुळे लोखंड बनवणाऱ्या जफर आणि इतर मुस्लिम रहिवाश्यांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागते. देव एकटाच फाळणीच्या विरोधात आहे.

पण जफरला चौधरी कुटुंबाविरुद्ध बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो देव ची दुसरी बायको रूपला आपल्या प्रेमात पाडायचा प्रयत्न करतो. रूप आपला खूप वेळ हीरामंडी मध्ये घालवते. हीरामंडी मध्येच बहार बेगम आणि जफर राहतात. ती तिथे शास्त्रीय संगीत शिकायला जाते.

शिबानी बाठीजा आणि अभिषेक वर्मन यांनी पटकथेमध्ये अनेक कथा आणि पात्र एकत्र गुंफायचा प्रयत्न केला आहे पण ते यात अपयशी ठरले आहेत. नाजायज मुलगा, एकाच व्यक्तीचे दोन लग्न आणि भारताचे विभाजन अगदी कादंबरीत शोभेल अशी कथा आहे. खूप गोष्टी एकाच वेळी दाखवायचा प्रयत्न केला आहे.

फारच कमी चित्रपटात फाळणी चा विषय संवेदनशीलपणे हाताळलेला आहे आणि कलंकचे नाव त्या यादीत बिल्कुल येत नाही. फर्स्ट हाफ मध्ये सगळं फोकस जफर आणि रूप वर आहे. चित्रपटाचा शेवट देखील आपली निराशा करतो.

चित्रपटात दर काही मिनीटांनी गाणी सुद्धा आहेत. प्रीतमने चित्रपटाला संगीत दिले आहे. शीर्षक गीत आणि 'घर मोरे परदेसी' या दोन गाण्यां व्यतिरिक्त इतर गाण्यांमुळे कथानक आणखी संथ होतो.

चित्रपटात तो काळ उभा करण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. त्या काळातले टाइपरायटर्स ते काळाशी साजेसा पेहराव असलेले अनेक ज्युनियर आर्टिस्ट यांसाठी खूप खर्च केला आहे. प्रोडक्शन डिझायनर अमृता महल नकाई यांनी हीरामंडी बाजाराचा आणि चौंधरींच्या महालाचा सेट खूप छान उभा केला आहे.

मनीष मल्होत्रा आणि मॅक्सिमा बसू गोलानी यांचे कॉश्च्युम उच्च दर्जाचे आहेत. हुस्नबाद मधली सगळीच लोकं १९४० मध्येपण उत्कृष्ट दर्जाचे कपडे घालत होते असे वाटतं. पटकथा कमजोर असली तरी हुसेन दलाल यांचे संवाद लक्षवेधक आहेत.

२२ वर्षा नंतर माधुरी दीक्षित नेने आणि संजय दत्त यांना एकत्र पडद्यावर पाहायची संधी या चित्रपटातून मिळाली असली तरी त्यांच्या वाट्याला फारच कमी सीन्स आले आहेत. रॉय कपूर आणि सिन्हा सुद्धा फक्त सह-कलाकारांच्या भूमिकेत दिसतात.

फक्त भट्ट आणि धवन या दोघांच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी आहे. दोघांची केमिस्ट्री चांगली आहे परंतु स्लो मोशन मध्ये चालणाऱ्या क्लायमॅक्स मुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. कुणाल खेमू यांनी त्यांच्या अभिनयातून सुखद धक्का दिला आहे. अब्दुल नावाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे.

बिनोद  प्रधान यांचे छायाचित्रण ही चित्रपटाची सर्वात जमेची बाजू. त्यांनी संपूर्ण चित्रपटात लाल रंगाचा कल्पकतेने वापर केला आहे. लाल हा रंग प्रेमाचा ही असू शकतो व द्वेषाचा देखील असू शकतो. चित्रपटात पुढे येणारा प्रेमभंग व रक्तपात ची कल्पना देण्यासाठी सुद्धा हा रंग वापरला असावा.

कलाकारांची फौज आणि चित्रपटाची कथा लक्षात घेता हा चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता.

Related topics

You might also like