Review Hindi

जवानी जानेमन रिव्ह्यू – हलका फुलका सहज सुंदर चित्रपट

Release Date: 31 Jan 2020 / Rated: U/A / 01hr 59min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

नितीन कक्कर यांच्या शहरी जीवनावर आधारित या चित्रपटात सैफ अली खान यांचा उत्कृष्ट अभिनय बघायला तर मिळतोच, सोबत आपल्या पहिल्या चित्रपटात अलाया एफ सुद्धा आश्वासक वाटत आहेत.

काही असे कलावंत असतात ज्यांना स्क्रीनवर स्वतःपासून पूर्णपणे वेगळे असे पात्र रंगवण्यात मजा येते, तर काही असे कलावंत असतात ज्यांना त्यांच्या पात्राने ओळखले जाणे आवडते. सैफ अली खान दुसऱ्या प्रकारात मोडतात.

खान आता पन्नाशीत बहुदा पोहचले असतील तरी सुद्धा प्रयोगाच्या संदर्भात ते सध्या आपल्या सर्वोत्तम काळात आहेत. नितीन कक्कर यांच्या जवानी जानेमन मध्ये ते वय वाढलेला प्लेबॉय रंगवीत आहेत, ज्याला अचानक एके दिवशी एका मोठ्या सत्याला सामोरे जावे लागते. सध्या चित्रपटांमध्ये सुरु असलेल्या देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या लाटांमध्ये जवानी जानेमन हा एक सुखद आणि मजेदार अनुभव म्हणता येईल.

जस्सी उर्फ जॅझ (सैफ अली खान) स्वतःच्या वाढत्या वयाला नाकारत मनमर्जीने जगण्यात विश्वास ठेवतो. तो स्वतःचे केस डाय करतो, सायकल वर वर्कआऊट करतो, डोळ्यावंर थंड आयपॅचेस लावतो. बिल किंवा भाडं भरणं तो एकदा विसरेल, पण नाईट क्लबला जाणे आणि डान्स फ्लोअर वर मुलींना पटवणं तो विसरत नाही. अशा वेळेस जेव्हा तो एका मुलीला पटवायला जातो आणि ती मुलगी म्हणते कि तो तिचा बाप असू शकतो, तेव्हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो.

तिया (अलाया एफ) जॅझ सारखीच स्वतंत्र आहे आणि अशा प्रकारचा बेजबाबदार बाप मिळाला तरी तिला त्यावर काहीच आक्षेप नसतो. पण जेव्हा तिला कळतं कि ती गरोदर आहे आणि पुढे आयुष्यात काय करायचं याबद्दल तिचं काहीच ठरलेलं नाही, त्यावेळी ती स्वतःला असुरक्षित समजू लागते. असे दोन भिन्न टोकाची माणसं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय गोंधळ उडतो हीच या चित्रपटाची गोष्ट आहे.

कक्कर यांच्या चित्रपटात दोघांची हलकी फुलकी जुगलबंदी आढळून येते आणि त्यांची मजेदार उत्तरं सहज आणि स्वाभाविक वाटतात. पटकथा उत्तम बांधली गेली आहे. मात्र मध्यंतरानंतर काही काळ त्याची पकड सैल होते जेव्हा जॅझ मध्ये होणारे बदल दाखवले जातात.

काही दृश्य मुद्दाम आहेत हे सुद्धा लक्षात येतं. जसं कि रॉकी (चंकी पांडे) हा जॅझ सारखाच वय वाढलेला बॅचलर आहे आणि त्याला एके दिवशी अचानक स्ट्रोक येतो आणि जॅझ अचानक स्वतःचा विचार करू लागतो. तसंच तियाचा प्रियकर सुद्धा फक्त कॉमेडी पुरता वापरण्यात आला आहे, ज्याला टाळता येणं शक्य होतं.

तरी सुद्धा काही मजेदार पात्रांमुळे आणि त्यांच्याभोवती गुंफलेल्या उत्तम गोष्टीमुळे हा चित्रपट मनोरंजक होतो.

कक्कर यांनी गोष्ट प्रस्तुत करण्यासाठी खूपच रंजक पद्धत वापरली आहे. वडील आणि मुली मधला रोमांस, त्यांची छोटी डेट आणि वडील-मुलीचं प्रेमाचं नातं हे सगळं खूप सुंदर पद्धतीने आलंय. वडील आणि मुलीच्या नात्यामध्ये समान सहभागितेची गोष्ट हिंदी चित्रपटांमध्ये तशी अभावानेच दिसते. आपल्या मुलीमुळेच जॅझ आपल्या आसपासच्या लोकांना ओळखायला लागतो. या गोष्टींमुळे चित्रपटाला आवश्यक अशी एक ठोस गंभीरता सुद्धा मिळाली आहे, अन्यथा चित्रपट फक्त वरवरचा राहिला असता.

सैफ अली खान वय वाढलेल्या प्लेबॉयच्या भूमिकेत फुल फॉर्म मध्ये दिसताहेत. गोंधळ, अचानक मिळालेला धक्का, असुरक्षितता आणि शेवटी स्वतःबद्दलची अनुभूती असे सगळे पैलू खान यांनी उत्तम पद्धतीने दर्शवले आहेत. खान यांचा अभिनय विचित्र आणि मनोरंजक असला तरी त्याला समजूतदारपणाची एक विशिष्ट किनार सुद्धा दाखवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

अलाया एफ हीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी तिचा वावर खूपच आश्वासक आहे. आपल्या पित्याच्या शोधात असलेली आणि तरुण वयात गुरफटलेली तिया तिने उत्तम दाखवली आहे. सहज हावभाव आणि स्वाभाविक अभिनयाने सैफ सोबत तिची केमिस्ट्री छान जुळून आली आहे.

सह-कलाकारांमध्ये कुब्रा सैत यांचा अभिनय उत्तम आहे. जॅझची हेयर स्टायलिस्ट आणि जवळची मैत्रीण असलेली हि भूमिका त्यांनी आपल्या स्वाभाविक अभिनयाने सहज वठवली आहे.

खान प्रमाणेच तब्बू छोट्या भूमिकेत सुद्धा कमाल करतात. हिप्पी-योगा आईच्या भूमिकेत तब्बू एक स्वच्छंदी आयुष्य जगणारी स्त्री रंगवतात, जी कधी हि कुठे हि जाऊ येऊ शकते. खान आणि तब्बू यांच्या पात्रांमधल्या पूर्णपणे भिन्न असलेल्या वैशिष्ट्यामुळे त्यांचे दृश्य सुद्धा उत्तम जमून आले आहेत.

जवानी जानेमन हा कुठलाही सामाजिक संदेश देत नाही आणि देशभक्तीच्या लाटेवर स्वार हि होत नाही, तरी सुद्धा एक सहज सुंदर, हलका फुलका मनोरंजक चित्रपट अनुभवण्याची हि नामी संधी आहे, एवढं निश्चित.

Related topics

You might also like