Review Hindi

छिछोरे रिव्ह्यू – नितेश तिवारी यांचा मनाला भिडणारा एन्टरटेनिंग चित्रपट

Release Date: 06 Sep 2019 / Rated: U/A / 02hr 26min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर अभिनित छिछोरे फक्त मनोरंजनच करत नाही तर चांगला संदेश सुद्धा देतो.

नितेश तिवारी दिग्दर्शित छिछोरेचा ट्रेलर पाहून आपल्याला काही हिंदी चित्रपटांची नक्की आठवण झाली असेल. मन्सूर खान यांचा जो जीता वही सिकंदर (१९९२) मध्ये दाखवलेली कॉलेजची मस्ती, विनर्स आणि लूजर्स यांच्यामध्ये सतत चाललेला स्पोर्ट्स ड्रमा यामुळे हा चित्रपट आठवतो.

जो जीता वही सिकंदरशी जरी थोडे साम्य असले तरी छिछोरेचा मूळ प्लॉट करण जोहर यांच्या स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) शी अधिक मेळ खातो.

१९९२ मध्ये कथेला सुरुवात होते. अनिरुद्ध (सुशांत सिंह राजपूत) मुंबईतील प्रतिष्ठित इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आणि तिथे त्याची सेक्सा (वरुण शर्मा), ऍसिड (नवीन पॉलिशेट्टी), बेवडा (सहर्ष कुमार शुक्ल) आणि डेरेक (ताहीर राज भसीन) या सिनियर्स सोबत भेट होते.

सुरुवातीला सिनियर्स सोबत काही विचलित करणाऱ्या घटना सोडल्या तर अनिरुद्ध आणि मम्मी (तुषार पांडे) हे ज्युनियर्स आणि सिनियर्सची चांगलीच गट्टी जमते. इथेच अनिरुद्ध माया (श्रद्धा कपूर) च्या प्रेमात पडतो. मायासुद्धा याच कॉलेजमध्ये शिकत असते.

हे सर्व ज्या हॉस्टेल मध्ये राहत असतात त्या हॉस्टेलमधल्या मुलांना रेगी (प्रतीक बब्बर) या उच्चभ्रू वर्गातल्या मुलाने लूजर्स असे टोपणनाव ठेवलेले असते. अनिरुद्ध आणि त्याच्या मित्रांनी जर रेगीच्या गॅंग ला वार्षिक खेळ महोत्सवात हरवले तर त्यांना लूजर्स हा डाग पुसता येईल.

आता २०१९ मध्ये एकेकाळचे हे घट्ट मित्र एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा नाहीत. पण एका घटनेमुळे ते सर्व पुन्हा एका हॉस्पिटलमध्ये एकत्र येतात.

स्टुडन्ट ऑफ द इयर शी असलेले साम्य तुम्हाला अजिबात खटकत नाही कारण नितेश तिवारी, पियुष गुप्ता आणि निखिल मल्होत्रा यांनी पटकथेतून २०१२ च्या त्या चित्रपटातील सर्व चुका दुरुस्त केल्यात आणि दाखवून दिले आहे की हा सेम प्लॉट नक्की कसा हाताळावा. भूतकाळ आणि वर्तमानकाळातल्या दोन महत्वाच्या घटना एकत्र करून लिहिलेली ही पटकथा म्हणजे उत्कृष्ट पटकथेचे एक उत्तम उदाहरण आहे. फिल्म स्कूल्स मध्ये ही पटकथा दाखवायला हवी.

तिवारी यांनी दंगल (२०१६) मधून खासकरून कुस्तीचे सीन्स मधून आपले दिग्दर्शन कौशल्य दाखवून दिले होते आणि इथेसुद्धा त्यांचे स्पोर्ट्स सीन्स हाताळण्यामध्ये असलेले प्राविण्य दिसून येते. या चित्रपटात तर त्यांना एकाच वेळी ४ स्पोर्ट्सवर फोकस करावा लागतो. जरी तुम्हाला माहिती असते की पुढे काय होणार आहे तरी तुमची उत्सुकता ताणून ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो.

तिवारी यांनी सर्वच कलाकारांकडून चान्गला अभिनय करवून घेतला आहे. सुशांत सिंह जरी कॉलेजचा मुलगा वाटत नसले तरी ही कसर त्यांनी आपल्या अभिनयातून भरून काढली आहे. श्रद्धा कपूर यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीतला बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. वरुण शर्मा यांचा सेक्सा क्षणभरही कंटाळा येऊ देत नाही. त्यांचे पात्र तुम्हाला फुकरे मधील चुचा ची आठवण करून देईल.

भसीन, पॉलिशेट्टी, पांडे आणि शुक्ल सर्वानीच चांगला अभिनय केला आहे. १९९२ असो अथवा २०१९, या सर्वांची मैत्री खरी वाटते आणि याचा चित्रपटाला खूप फायदा होतो. कॉलेजची गोष्ट हा चित्रपटाच्या कथेचा एक भाग आहे पण त्याचबरोबर आपल्या पालकांसोबत संवाद तुटलेल्या मुलासोबत पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न हा सुद्धा कथेचा एक महत्वाचा भाग आहे आणि हा भाग यशस्वीपणे पेलला यातच छिछोरेचे खरे यश आहे.

काही लोकं आय सी यु मध्ये असलेल्या पेशंटला घेरून उभे आहेत आणि डॉक्टरला याचा काहीच प्रॉब्लेम नाही ही गोष्ट मात्र आपल्याला खटकते. चित्रपटात इतरही काही छोट्या चुका आहेत, पण चित्रपट पाहण्यात तुम्ही इतके मग्न असता की तुमच्या लक्षातच येत नाहीत. आपण यश मिळाले तर आनंद साजरा करतो तसेच अपयश मिळाले तर ते पचवण्याची ताकद मात्र आपल्यात नसते हा संदेश या चित्रपटातून दिला आहे.

Related topics

You might also like