संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेते सचित पाटील निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत.
सोनाली कुलकर्णी अभिनित तमाशा लाईव्हचे शूटिंग सुरु
मुंबई - 20 Sep 2021 13:17 IST
Updated : 03 Oct 2021 12:18 IST


Our Correspondent
सोनाली कुलकर्णी अभिनित तमाशा लाईव्ह या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरु झाले आहे.
दुनियादारी (२०१३) आणि प्यारवाली लव्ह स्टोरी (२०१४) सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
मनीष कदम यांच्या कथेवर दिग्दर्शक जाधव यांनीच पटकथा लिहिली आहे.
चित्रपटकर्त्यांनी चित्रपटातील इतर कलावंतांविषयी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेस पुष्कर जोग आणि हेमांगी कवी उपस्थित होते. त्याअर्थी हे कलाकार चित्रपटात असण्याची शक्यता आहे.
चित्रपटाच्या शीर्षकावरून महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेभोवती हा चित्रपट केंद्रित आहे, हे लक्षात येते. एकूण ३० गाणी या चित्रपटात आहेत. कुठल्याही मराठी चित्रपटासाठी हा आता पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
चित्रपटाचे संगीत अमितराज आणि पंकज पडघन यांनी दिले आहे. गीते क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत.
या चित्रपटाद्वारे अभिनेते सचित पाटील निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. त्यांच्यासोबत अक्षय बर्दापूरकर, पियुष सिंह, अभयानंद सिंह आणि प्रकाश वैद्य सह-निर्माते आहेत.
निर्माता म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी पाटील यांनी सांगितले, "मी स्क्रीनवर आतापर्यंत बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत, मात्र यावेळेस पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मला आनंद होतोय कि तमाशा लाईव्ह संजय जाधव, अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठीच्या कुटुंबाशी जोडला जातोय आणि माझे मित्र नितीन वैद्य या सगळ्यात मला मदत करताहेत.
"आमच्यासाठी हे स्वप्नवत आहे. कारण आम्ही आमच्या पहिल्या निर्मितीसाठी एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होतो आणि आम्हाला आनंद होतोय कि आम्ही तमाशा लाईव्ह सारखा वेगळा चित्रपट करतोय. मला खात्री आहे कि प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट आवडेल."
कुलकर्णी आणि पाटील यांच्या सोबत काम करण्याविषयी जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, "सोनाली आणि मी बऱ्याच वर्षांचे मित्र आहोत आणि आमच्या कामात त्याचा उपयोग होतो. सोनाली उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या कामाविषयी मला जास्त बोलायची आवश्यकता नाही. आणि आपण सगळ्यांनी सचित पाटील यांचा अभिनय पाहिलाय. पहिल्यांदाच ते निर्माता बनून येताहेत आणि प्लॅनेट मराठी सोबत हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे अर्थातच मी आनंदी आहे. एकंदरीत, तमाशा लाईव्हसाठी मी खूप उत्साहित आहे."
प्लॅनेट मराठी या निर्मिती संस्था आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक आणि मुख्य अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटले, "तमाशा लाईव्हची शूटिंग गणेशोत्सवाच्या पावन पर्वात सुरु होत आहे. याला बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. मी संजय सोबत सुद्धा एक प्रोजेक्ट करतोय आणि सोनाली सोबत सुद्धा. आता, तमाशा लाईव्हमुळे सचित सुद्धा आमच्या कुटुंबात सामील झालाय. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा काही तरी नवं बघायला मिळणार आहे."
हाकामारी (२०२१) नंतर प्लॅनेट मराठी सोबत कुलकर्णी यांचा हा दुसरा चित्रपट आहे. तमाशा लाईव्ह दिवाळी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.
Related topics