एस सागर रचित आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सागर फडके यांनी स्वरसाज दिलाय. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा त्याग सुद्धा या व्हिडीओ मध्ये अधोरेखित केला आहे.
'तू परत ये' गाण्यातून मराठी कलावंत देवाकडे विनवणी करताहेत
मुंबई - 07 May 2020 19:15 IST


Suyog Zore
देश सध्या कोविड-१९ मुळे घातलेल्या लॉकडाऊन च्या तिसऱ्या सत्रात आहे. पॉजिटीव्ह केसेस दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. भविष्यकाळ अजूनही पुरता सावरताना दिसत नाहीय, त्यामुळे काही मराठी कलावंतांनी एकत्र येऊन 'तू परत ये' या गाण्यातून देवाकडे विनवणी केली आहे.
हे गाणे एस सागर यांनी लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय. हे एक हळुवार गाणे आहे. एकदा ऐकल्यावर कदाचित हे तितकेसे लक्षात राहणार नाही, मात्र वारंवार ऐकल्यावर यातली आर्तता लक्षात येते. सागर फडके यांच्या आवाजाला सुद्धा याचे श्रेय द्यावे लागेल.
या गाण्यात प्रथमेश परब, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, प्रणव रावराणे, अक्षय टांकसाळे, निखिल वैरागर, विजय अनादलकर, जयेश चव्हाण, सिद्धेश्वर झाडबुके, स्वरूप बाळासाहेब सावंत, डॉ रिची अशोक जैन आणि संगीता व आर्यन झलानी सहभागी झालेत. प्रत्येक कलावंतानी गाण्याचे शूट आपल्या घरी राहून किंवा मोकळ्या भागात केले आहे.
गाण्यातून डॉक्टर्सच्या व्यथा सुद्धा मांडण्यात आल्या आहेत, जे या लढाईत अनेक गोष्टींचा त्याग करत आहेत. आपण बघतो कि एक डॉक्टर घरी परतल्यावर स्वतःच्या मुलाला मिठी मारू शकत नाही. सावधगिरी म्हणून तो स्वतःला स्वच्छ करतो आणि वेगळ्या खोलीत जेवतो. जर त्यालाही संसर्ग झाला असेल, तर त्याच्या नकळत त्याच्या कुटुंबियांना संसर्ग होऊ नये याची सुद्धा तो खबरदारी घेतोय. या गोष्टीमुळे व्हिडिओचा प्रभाव अधिक वाढतो. गाणे येथे पहा.