{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बलविंदर सिंह संधू आणि सय्यद किरमाणींच्या भूमिकेत एमी विर्क, साहिल खट्टर – ८३ चित्रपटाचे नवे पोस्टर


कबीर खान दिग्दर्शित ८३ चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होतोय.

Shriram Iyengar

टीम ८३ हळू हळू पूर्णरूप घेतेय. टीमच्या आणखी काही खेळाडूंची ओळख करून देताना बलविंदर सिंह संधू आणि सय्यद किरमाणी या भारताच्या पहिल्या विश्वकप विजेत्या क्रिकेट टीमच्या दोन महत्वपूर्ण खेळाडूंचे पोस्टर्स समोर आलेत.

साहिल खट्टर सय्यद किरमाणींच्या भूमिकेत दिसताहेत. त्यांचे पोस्टर १९ जानेवारीला बाहेर आणले गेले, तर त्याच्या पुढच्याच दिवशी एमी विर्क यांचे बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेतील पोस्टर पोस्ट करण्यात आले.

खट्टर हुबेहूब यष्टीरक्षक सय्यद किरमाणी सारखे दिसताहेत. आणखी एक कॅच पकडण्याच्या तयारीत खट्टर या पोस्टर मध्ये दिसताहेत. किरमाणी विकेट किपींग आणि बॅटिंग दोन्हींमध्ये भारतासाठी उपयुक्त होते. विश्वकप मधील पहिल्या राउंडच्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये किरमाणी यांनी तीन झेल आणि दोन यष्टिचित मिळवत रेकॉर्ड केला होता. याच मॅच मध्ये कपिल देव यांच्या गाजलेल्या १७५ धावांसोबत नवव्या विकेटच्या १२६ धावांच्या भागीदारीत सय्यद किरमाणी यांच्या २४ धावांचा हातभार होता. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला हरवून विश्वकप स्पर्धेत पुढे वाटचाल केली.

एमी विर्क हे बलविंदर सिंह संधू यांची भूमिका साकारताहेत. बलविंदर सिंह संधू मध्यमगतीचे गोलंदाज होते ज्यांनी रॉजर बिन्नीसोबत या स्पर्धेत महत्वाच्या विकेट्स काढल्या. संधू यांनी या चित्रपटासाठी कलाकारांना सुद्धा कोचिंग दिली आहे.

विर्क संधू यांच्या शैलीत विकेट घेतल्यानंतरच्या जल्लोषात दिसताहेत. संधू यांनी १९८३ च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किरमाणीसोबत खालच्या क्रमांकाला येऊन २२ महत्वपूर्ण धावा काढल्या. त्यांच्या भागीदारीमुळे भारत १८३ धावांपर्यंत पोहचू शकला. यानंतर संधू यांनी वेस्ट इंडिजच्या विध्वसंक मानल्या जाणाऱ्या ओपनर गोर्डन ग्रीनीज यांना इनस्विंग डिलिव्हरी टाकून खेळाचे रूपच पालटले. 

८३ चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे आणि साजिद नाडियाडवाला, फँटम फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होतोय.

Related topics

Poster review