{ Page-Title / Story-Title }

News Hindi

खरी धर्मनिरपेक्षता म्हणजे कुठल्याही समाजाच्या आक्रमक विचारांना दूर ठेवणे, जावेद अख्तर यांचे भाष्य


आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका समारोहात प्रसिद्ध स्क्रीनलेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर बोलत होते.

फाईल फोटो (शटरबग्ज इमेजेस)

Keyur Seta

ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित एका खास समारंभात जावेद अख्तर पेन मर्यादित स्वरूपात लाँच करण्यात आले. १७ जानेवारीला जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे.

दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी जावेद अख्तर यांची याप्रसंगी मुलाखत घेतली. आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून त्यांनी काही प्रश्न विचारले.

जावेद अख्तर यांनी हातचे काहीही राखून न ठेवता उत्तरे दिली. "आज आपण जे अनुभवतो आहोत ते आपणच कमावलं आहे," ते म्हणाले. "खूप गोष्टी आहेत. आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळल्या, खासकरून शिकलेल्या लोकांनी. ते आपल्या घरी बसून राजकारणावर चर्चा करतात, पण बाहेर येऊन स्पष्टपणे आपलं मत मांडत नाहीत."

कुठल्याही पक्षाचं किंवा संस्थेचं नाव न घेता त्यांनी अल्पसंख्यांकांना खुश करणाऱ्यांचा समाचार घेतला. "आज तुम्ही जे सामाजिक मुद्दे बघताहात ते धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या धारणेचा परिणाम आहेत. धरनिरपेक्षतेच्या आपल्या संकल्पना खूप चुकीच्या आहेत. काही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ फक्त अल्पसंख्यांकांच्या कट्टरतेचा बचाव करणे एवढाच असतो. याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाहीत आणि त्याचीच किंमत ते चुकवत आहेत," जावेद अख्तर यांनी सांगितलं.

समारंभात जावेद अख्तर यांचा सत्कार करताना

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, याबद्दल बोलताना ते म्हणाले, "कुठल्याही समाजाच्या आक्रमक विचारांपासून समान अंतर ठेवणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. जो पर्यंत तुम्ही अल्पसंख्याकांना कुरवाळत राहाल, तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा समस्या निर्माण करत राहाल. आपण बऱ्याच काळापर्यंत हेच करत आलोत."

सत्तेत कुठलाही पक्ष असो, जावेद अख्तर नेहमीच राष्ट्रीय राजकारणावर बोलत आलेत. आजच्या परिस्थितीमध्ये जे लोक 'आम्हाला राजकारणात रस नाही' असं म्हणतात, त्यांच्यावरही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं.

"लोक म्हणतात, 'आम्हाला राजकारणात रस नाही.' या विधानाला काहीही अर्थ नाही. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं झालं कि 'मला प्रदूषणात रस नाही.' पण ते पसरत जाणार आहे. तुम्हाला त्यात रस असो वा नसो, तुम्ही प्रदूषणातच राहत आहात."

Related topics