जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या खुसखुशीत गाण्याला चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे आणि शाल्मली खोलगडे यांनी स्वरसाज चढवला आहे.
चोरीचा मामलाचे 'अल्बम काढाल काय' गाणे – या बहारदार गाण्यात अमृता खानविलकर हेमंत ढोमे यांना अल्बम काढायला सांगताहेत
मुंबई - 14 Jan 2020 2:41 IST


Suyog Zore
मॅड कॉमेडी असलेल्या चोरीचा मामला या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच बाहेर आले आहे. या गाण्यात ग्लॅमरस अमृता खानविलकर हेमंत ढोमे यांना त्यांचा गाण्याचा अल्बम काढण्यासाठी रिझवताना दिसत आहेत.
या गाण्यातील लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे यातील वेगळी कोरिओग्राफी. गाण्यात लाईट्सचा वारेमाप वापर करण्यात आलेला आहे. बॅकलाईटचा वापर करत चकचकीतपणा आणण्याचा प्रयत्न असला तरी तो त्रासदायक वाटतोय आणि त्यामुळे डान्सवरून लक्ष दूर होत आहे.
अमृता खविलकर मात्र या टिपिकल आयटम नंबर गाण्यात लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. शाल्मली खोलगडे यांनी त्यांच्या आवाजातून खोडकरपणा अचूकपणे आणला आहे. हेमंत ढोमे यांना सोफ्यावर बसण्याखेरीज गाण्यात दुसरे कुठलेच काम नाही.
चिनार-महेश यांचं संगीत साधारण श्रेणीतील आहे आणि त्यात नावीन्य असे काही नाही. ड्रमबीट्सच्या मदतीने त्यांनी गाण्याला गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो म्हणावा तितका यशस्वी ठरलेला नाही.
जितेंद्र जोशी यांनी गाण्यात सोशल मीडियावरील अनेक शब्दांचा वापर केला आहे, जसे कि कॉमेंट, टिकटॉक, युट्युब, इत्यादी. पण गाण्याचे बोल उठावदार वाटत नाहीत.
चोरीचा मामला हा एक मॅड कॉमेडी आहे. खानविलकर, जितेंद्र जोशी, ढोमे आणि अनिकेत विश्वासराव चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
अभिनेता ते दिग्दर्शक बनलेल्या प्रियदर्शन जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चोरीचा मामला ३१ जानेवारीला प्रदर्शित होतोय.
गाणे येथे पहा आणि आम्हाला सांगा कि तुम्हाला हा चित्रपट बघायला आवडेल का?