News Marathi

डार्लिंग चित्रपटात रितिका श्रोत्री?


दिग्दर्शक समीर आशा पाटील यांचा चौर्य (२०१६), यंटम (२०१८) आणि वाघेऱ्या (२०१८) नंतरचा हा चौथा चित्रपट आहे.

Our Correspondent

गेल्या वर्षी हिट ठरलेल्या टकाटक (२०१९) चित्रपटाचे एक निर्माते अजय ठाकूर यांनी आता अमित धुपे, वि जे शलाका आणि निखिल खजिनदार यांच्या सोबत ७ (सेवेन) हॉर्स एंटरटेनमेंट हि निर्मिती संस्था सुरु केली आहे. या संस्थेमार्फत आगामी डार्लिंग या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. वि पत्के फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.

या चित्रपटाच्या कलाकारांबाबतीत अजून तरी गुप्तता पाळण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील करत आहेत. चौर्य (२०१६), यंटम (२०१८) आणि वाघेऱ्या (२०१८) नंतरचा हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. या प्रोजेक्ट मध्ये ते सुद्धा एक निर्माते आहेत.

चित्रपटाचे शीर्षक आणि शीर्षक टीजर कडे बघता हे लक्षात येतं कि हा चित्रपट प्रेमाच्या संकल्पनेभोवती फिरतो आणि आजच्या तरुणांना लक्षात ठेऊन बनवण्यात येतोय.

पाटील यांनी फेसबुक वर चित्रपटाच्या मुख्य नायिकेचा फोटो टाकला आहे. मात्र अभिनेत्रीच्या चेहऱ्या समोर क्लॅपबोर्ड धरण्यात आला असल्यामुळे तिचा चेहरा पूर्ण दिसत नाही. पाटील यांनी लोकांनाच हि कोण असेल याचा अंदाज बांधायला सांगितलंय. फोटो बघून असा अंदाज येतोय कि ह्या अभिनेत्री रितिका श्रोत्री असाव्यात. कमेंट्स मध्ये बऱ्याच लोकांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलंय.

दुसरं म्हणजे श्रोत्री यांनी स्वतः चित्रपटाचं शीर्षक टीजर पोस्ट केलं होतं. टकाटक चित्रपटात त्या दोन मुख्य नायिकांपैकी एक होत्या.

डार्लिंग १२ जून २०२० ला प्रदर्शित होतोय.

Related topics