News Marathi

वाजवूया बँड बाजा टीजर – तीन भावांच्या लग्नाच्या शोधाचा विनोदी चित्रपट


हा चित्रपट प्रासंगिक विनोदी चित्रपट म्हणून समोर आला असला तरी इथे फारशी विनोद निर्मिती होताना दिसत नाही.

Suyog Zore

चित्रपटाचं शीर्षक आणि यापूर्वी आलेलं पोस्टर बघून वाजवूया बँड बाजा (२०२०) लग्न या विषयाभोवती फिरणारा चित्रपट असेल हे कळले होतेच. चित्रपटाच्या पहिल्या टीजर ने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

या चित्रपटाची कथा तीन भावांची आहे. समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई आणि चिन्मय उदगीरकर यात भावांची भूमिका करत आहेत. तिघांनाही लग्नाची घाई आहे. उदगीरकर प्रीतम कांगणे यांच्या पात्राच्या प्रेमात पडतात, तर धर्माधिकारी अश्विनी खैरनार यांच्या पात्राच्या प्रेमात पडतात.

तीन भावांचे विशिष्ट स्वभाव आहेत. धर्माधिकारी मोठे भाऊ बनले आहेत जो अगदी साधा, सरळ आहे, तर छोटा भाऊ असलेले उदगीरकर स्मार्ट आणि हुशार दाखवला आहे.

चित्रपटाच्या कथेमध्ये धमाल प्रासंगिक विनोदाची पूर्ण शक्यता आहे, पण टीजर मधून तसे काही जाणवत नाही. शिवाजी लोटन पाटील यांचा हा अत्यंत साधा प्रयत्न आहे असं जाणवतं. त्यांनी यापूर्वी सामाजिक आशयाचे दर्जेदार चित्रपट अधिक केले आहेत. टीजर मध्ये ज्या दर्जाचा विनोद बघायला मिळतोय, त्यापेक्षा अधिक चांगला चित्रपट प्रत्यक्षात बघायला मिळेल अशी आशा करूया. 

वाजवूया बँड बाजाची निर्मिती अमोल कागणे यांनी अमोल कागणे फिल्म्स या बॅनर खाली केली आहे. यापूर्वी त्यांनी हलाल (२०१७), लेथ जोशी (२०१८) आणि परफ्युम (२०१९) या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

चित्रपट २० मार्चला प्रदर्शित होतोय. टीजर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्हाला हा चित्रपट बघायला आवडेल का?

Related topics

Teaser review