वेब-सीरीजच्या पहिल्या सीजनला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे अभिनेते स्वप्नील जोशी आनंदी आहेत. सतीश राजवाडे यांनी या सीजनचे दिग्दर्शन केले आहे आणि नितीश भारद्वाज यांची सुद्धा यात महत्वाची भूमिका आहे.
समांतरच्या दुसऱ्या सीजनची योजना लॉकडाऊन नंतर, म्हणताहेत स्वप्नील जोशी
मुंबई - 05 Apr 2020 23:16 IST


Keyur Seta
अभिनेते स्वप्नील जोशी आपल्या पहिल्या वेब-सीरीजला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे खुश आहेत. "हा प्रतिसाद अविश्वसनीय आहे. फारच कमाल आहे," आमच्याशी झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले. "हा प्रतिसाद बघून दडपण सुद्धा येतं."
सतीश राजवाडे दिग्दर्शित समांतर हि एक थ्रिलर वेब-सीरीज आहे जी सुहास शिरवाळकरांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सुद्धा यात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
जोशींचं म्हणणं आहे कि लॉकडाऊन हे सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे लोकं या काळात ऑनलाईन कंटेंट बघत आहेत. "मला वाटतं सगळीच मंडळी घरी आहेत, त्यामुळे ते ओटीटी बघत आहेत. बऱ्याच टीव्ही चॅनल्सने त्यांचे जुने कंटेंट पुन्हा लावणे सुरु केले आहे, कारण एपिसोड बँक संपलेली आहे. यामुळेही बरेच लोक ओटीटी बघत आहेत," ते म्हणाले.
समांतरच्या पहिल्या सीजनच्या शेवटामुळे दुसऱ्या सीजनची शक्यता निश्चितच कळते. दुसऱ्या सीजनबद्दल विचारल्यावर जोशी म्हणाले, "अर्थातच तशी योजना आहे, पण जसं इतरांचं झालंय, तशी आमची योजना सुद्धा लॉकडाऊनमुळे हलली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन नंतर जेव्हा सगळं काही सुरळीत सुरु होईल, तेव्हाच पुढील योजना बनेल."
त्यांच्या म्हणण्यानुसार कुठलीही योजना आखण्यासाठी हि वेळ योग्य नाही. "सध्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज सांगण्यात येतोय. काहींच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल तर काही म्हणताहेत कि लॉकडाऊन ३० जून पर्यंत चालेल. म्हणून आम्ही आता वाट बघायचं ठरवलंय. लॉकडाऊन संपू द्या आणि मगच पुढचा विचार करण्यात येईल," त्यांनी सांगितले.
जोशी आगामी बळी (२०२०) या चित्रपटातून दिसतील.