News Marathi

गृहिणींना सुद्धा त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी हे मान्सून फुटबॉल मध्ये दाखवले आहे – शालिनी ठाकरे

Read in: English


या चित्रपटात चक दे! इंडिया (२००७) फेम सागरिका घाटगे, विद्या माळवदे, सीमा आझमी आणि चित्राशी रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात या चौघीही गृहिणी आहेत.

Keyur Seta

गेल्या दशकभरात स्त्री पात्र प्रमुख भूमिकेमध्ये असलेल्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. दिग्दर्शक मिलिंद उके यांच्या मान्सून फुटबॉल मध्ये चार गृहिणी एकत्र येऊन स्वतःचा फुटबॉल क्लब सुरु करतात अशी कथा आहे.

शालिनी ठाकरेंच्या सिनेमंत्रा एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहेत.

सिनेस्तान.कॉम शी बोलताना ठाकरे म्हणाल्या, "तुम्ही दिवसभर घरात बसून काय करता, असा प्रश्न गृहिणींना नेहमी विचारला जातो. यावरून आपण गृहिणींना किती गृहीत धरतो हे सिद्ध होते."

चित्रपटात चक दे! इंडिया (२००७) फेम सागरिका घाटगे, विद्या माळवदे, सीमा आझमी आणि चित्राशी रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डेल्नाझ इराणी आणि प्रीतम कागणे सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.

"या गृहिणी कोणताही ब्रेक न घेता २४ तास काम करत असतात, यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. स्वतःसाठी वेळ मिळावा यासाठी या गृहिणी एकत्र येऊन फुटबॉल क्लब ची स्थापना करतात. चित्रपटाचे शीर्षक मान्सून फुटबॉल असे असल्यामुळे पावसाळ्यातच हा चित्रपट प्रदर्शित होईल," ठाकरे म्हणाल्या.

शालिनी ठाकरे

या अगोदर शालिनी ठाकरेंनी मराठी ब्लॉकबस्टर लय भारी (२०१४) आणि लव्ह सोनिया (२०१८) या वास्तववादी हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट निवडताना तो बॉक्स ऑफिसवर किती हिट होईल हे त्यांच्यासाठी महत्वाचे असते का फक्त चित्रपटाचा आशय, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, "दोन्ही गोष्टींचा योग्य बॅलन्स असायला हवा. कोणीही पाहणार नाही असा चित्रपट बनवण्यात काहीच अर्थ नाही.

"मला खात्री आहे की लोकं मान्सून फुटबॉल पाहायला नक्की येतील. आम्हाला लय भारी विषयी सुद्धा खात्री होती. अगदी पहिल्या दिवसापासूनच आम्हाला माहित होतं की हा चित्रपट सुपरहिट होणार."

चित्रपट निवडताना ठाकरे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स चा सुद्धा विचार करतात. "लव्ह सोनिया हा आमच्यासाठी सुद्धा एक प्रयोग होता. आम्हाला माहित होतं की जरी चित्रपट बॉक्सऑफिस वर चालला नाही तरी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लोकं हा चित्रपट नक्की पाहतील. सध्या तो हॉटस्टार वर दाखवला जात आहे."

ऑनलाइन प्लॅटफॉर्म विषयी अधिक बोलताना ठाकरे म्हणाल्या की त्यांची कंपनी वेब-सिरीज मध्ये इंटरेस्टेड आहे. "आम्ही यावर काम देखील सुरु केलं आहे आणि लवकरच शूटिंगला देखील सुरुवात होईल. एक मराठी आणि एक हिंदी अशा दोन वेब-सिरीज आम्ही बनवत आहोत."

Related topics