{ Page-Title / Story-Title }

News Marathi

माझा लाल्या काशिनाथ घाणेकरांच्या लाल्यापेक्षा खूप वेगळा असेल – सुबोध भावे


अश्रूंची झाली फुले मधून पुन्हा नाटकात काम करण्यास सज्ज असलेल्या सुबोध भावे यांनी आमच्याशी गप्पा मारल्या.

Keyur Seta

सुबोध भावे यांनी डॉ काशिनाथ घाणेकरांनी एके काळी गाजवलेली लाल्या ची भूमिका आणि... डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटात काही क्षणांसाठी साकारली होती.

आता ते प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकात पुन्हा एकदा लाल्या ची भूमिका बजावणार आहेत. पण हा लाल्या चित्रपटातल्या लाल्या पेक्षा खूप वेगळा असेल.

"घाणेकर लाल्या कसा साकारत असतील याचा विचार करून मी चित्रपटात लाल्या साकारला होता. इथे मात्र मी स्वतः लाल्या साकारत आहे, त्यामुळे मी हे पात्र माझ्या पद्धतीने उभं करणार. चित्रपटात दिसलेला लाल्या तुम्हाला इथे नाटकात पाहायला मिळणार नाही. हा लाल्या खूप वेगळा असू शकतो," आमच्याशी गप्पा मारताना भावे म्हणाले.

अश्रूंची झाली फुले ही एका प्रामाणिक सदाचारी प्रोफेसर आणि द्वाड व अहंकारी विद्यार्थी लाल्या ची गोष्ट आहे. प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांनी हे नाटक लिहले आहे.

"नाटकात काम करणे कठीणच असते आणि ही भूमिका तर खूपच कठीण आहे. कानेटकरांची भाषा जितकी सुंदर आहे तितकीच अवघड देखील आहे. आपण आता जसे बोलतो तसे त्यांच्या नाटकात बोलू शकत नाही. नाटकात अनेक पात्रं आहेत. जुना काळ दाखवत असल्याने नेपथ्य सुद्धा भव्य असणार, त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे," भावे म्हणाले.

गेल्या काही वर्षात काही मोठ्या कलाकारांनी ही भूमिका साकारली आहे. रमेश भाटकरांनी सुद्धा लाल्या ची भूमिका साकारली होती. "अनेकांना संपूर्ण नाटक तोंडपाठ आहे तर नव्या पिढितील काही जणांनी या नाटकाविषयी ऐकले सुद्धा नाही, त्यामुळे आमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे.

"आम्ही गेल्यावर्षी घाणेकर च्या रिलीज दरम्यान अश्रूंची झाली फुले नाटकाचे प्रयोग करणार होतो. पण सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असल्याने दिड महिना नाटकाच्या सरावासाठी वेळ काढणे बहुतेकांना अशक्य होते," भावे म्हणाले.

सुबोध भावे यांना नाटक तर करायचेच होते. शेवटी त्यांनी ते आता करायचे ठरवले. "मी सहा वर्षानंतर नाटकात काम करत आहे. पुन्हा नाटक करायचं अशी माझी तीव्र इच्छा होती. इतर कलाकार नाटकात काम करताना पाहून मला ईर्ष्या होत असे. उत्सुकता, भीती, आनंद या सगळ्याच भावना मी आता अनुभवत आहे.

"नाटकाचे ५१ प्रयोग होतील. पहिला प्रयोग १ मे ला नाशिक ला झाला. नाशिक ही कानेटकरांची जन्मभूमी असल्याने त्यांना आदरांजली म्हणून आम्ही नाशिकपासून नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करायचे ठरवले," भावे म्हणाले.

नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख आणि उमेश जगताप यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

Related topics