चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांच्या सुद्धा भूमिका आहेत.
बी एम सी सफाई कर्मचाऱ्याची भूमिका करणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता: भाऊ कदम
Mumbai - 09 Jan 2019 22:32 IST


Keyur Seta
नशीबवान मध्ये भाऊ कदम एका बी एम सी (बृहमुंबई महानगर पालिका)च्या सफाई कर्मचाऱ्याची भूमिका करत आहेत. प्रसिद्ध कॅमेरामन अमोल गोळे ह्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांच्या देखील भूमिका आहेत.
चित्रपट आणि चित्रपटातील त्यांची भूमिका याविषयी भाऊ कदम यांनी सिनेस्तान.कॉम शी गप्पा मारल्या. भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, "मी बबन नावाची भूमिका करतोय. तो एक बी एम सी सफाई कर्मचारी आहे. चित्रपटात बबन हे प्रमुख पात्र आहे. आयुष्याच्या एका वळणावर त्याच्या आयुष्यात अचानक काही मोठे बदल घडू लागतात, आता पुढे काय होणार? हीच चित्रपटाची कथा आहे. सुरुवातीला शांत असलेला तो नंतर धाडसी हिरो होतो."
ह्या भूमिकेसाठी काही रिसर्च करावा लागला का, असे विचारले असता त्यांनी हसत उत्तर दिले, "झाडू मारण्यासाठी रिसर्च नाही करावा लागत. मी सगळी जबाबदारी दिग्दर्शक अमोल गोळेवर सोपवली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे सांगाल ते मी करेन. माझ्यासाठी हा एक चांगला अनुभव होता. चित्रपटात मोजून एक-दोन सीन्स असतील ज्यात मी झाडू मारताना दिसतो."
ह्या अगोदर अमोल गोळेंनी स्टॅन्ली का डब्बा (२०११), टुरिंग टॉकीज (२०१३), एलिझाबेथ एकादशी (२०१४), हवा हवाई (२०१४), रंगा पतंगा (२०१६) अश्या काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी छायाचित्रण केले आहे.
मग शेवटी बबन नशीबवान होतो का नाही? या प्रश्नाला उत्तर देत भाऊ कदम म्हणाले, "बबन नशीबवान होतो का नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मी हे आत्ताच रिव्हिल करणे योग्य नाही. तुम्हाला ते पाहायला नक्कीच आवडेल."
भाऊ कदम यांनी काही चित्रपटात अभिनय केला आहे पण ते जास्त प्रसिद्ध आहेत चला हवा येऊ द्या आणि त्या अगोदरच्या फु बाई फु ह्या विनोदी मालिकांसाठी.
ह्या मालिकांमुळेच ते एक विनोदी अभिनेता म्हणून सुप्रसिद्ध झाले. "मला गंभीर आणि विनोदी अश्या दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला आवडतात," कदम म्हणाले. "मी एक कलाकार आहे त्यामुळे माझ्या वाट्याला ज्या भूमिका येतात त्या मी प्रामाणीकपणे करतो. आपण जे काही काम करतो त्याचा आपण आनंद घ्यायला हवा."
लँडमार्क फिल्म्स ची निर्मिती असलेला हा चित्रपट ११ जानेवारी ला रिलीज होणार आहे.