News Marathi

मोशन पोस्टर – रेडू चे दिग्दर्शक सागर वंजारी यांच्या पुढील चित्रपटाचे नाव रापण आहे

Read in: English


रंगा पतंगा (२०१६) चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनीच हा चित्रपट लिहला आहे.

Keyur Seta

दिग्दर्शक सागर वंजारी यांचा रेडू गेल्यावर्षी रिलीज झाला तेव्हा त्याला समीक्षकांची वाहवा मिळाली होती. शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजला गेला होता.

आता तेच दिग्दर्शक रापण हा नवीन चित्रपट घेऊन आले आहेत. रेडू चित्रपटाचे निर्माते ब्लिंक मोशन पिक्चर्स ह्यांनीच ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीजची तारीख आणि कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यातच ठेवली आहेत. पण नुकतेच चित्रपटाच्या फेसबुक पेजवरून त्यांनी नवे वर्ष... नवी सुरुवात... नव्या महत्वाकांक्षा... क्षितीजाच्या पल्याड... रापण! ह्या कॅप्शन बरोबर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले.

कोंकणी बोलीभाषेमध्ये रापणला मच्छिमारी म्हणतात.

एका होडीचे चित्र हळूहळू बदलून एका खऱ्या होडीत रूपांतरित होते. ड्रोन च्या साहायाने हे दृश्य शूट केले आहे.

टायटल आणि मोशन पोस्टर वरून असे वाटते की कोंकणातल्या सागरी किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे.

होडीचे विहंगमय दृश्य तुमचे डोळे दिपवून टाकते. वेस्टर्न पार्श्वसंगीताचा वापर ही एक इंटरेस्टिंग निवड आहे. ग्रामीण भागातील ही कथा आहे असे वाटते.

होडी पाहून आपल्याला लगेच नुकत्याच रिलीज झालेल्या थग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाची आठवण होते.

मकरंद अनासपुरे आणि संदीप पाठक यांची प्रमुख भूमिका असलेला रंगा पतंगा (२०१६) चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनीच हा चित्रपट लिहला आहे.

 

Related topics