News Hindi

टोटल धमाल मधील 'पैसा ये पैसा' गाणे – माधुरी दीक्षित सुंदर दिसत आहेत पण गाण्यात किशोर कुमारच्या आवाजाची जादू नाही


गाण्यात कलाकारांचा उत्साह दिसत नाही, त्यामुळे गाण्याचा प्रभाव कमी होतो.

Mayur Lookhar

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित लज्जा (२००१) नंतर पुन्हा इंद्र कुमारच्या टोटल धमाल या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

निर्मात्यांनी नुकतेच 'पैसा ये पैसा' हे गाणे रिलीज केले. सुभाष घई दिग्दर्शित कर्ज (१९८०) चित्रपटातील 'पैसा ये पैसा' या गाण्याचे हे रिमिक्स वर्जन आहे.

ओरिजिनल गाणे किशोर कुमारने गायले होते. धमाल फ्रँचाइज मध्ये सगळी पात्रं एका दडवून ठेवलेल्या खजिन्याच्या मागावर आहेत त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाशी हे गाणे अगदी योग्य मेळ खाते. परंतु हे नवीन गाणे आपला अपेक्षाभंग करते.

आनंद बक्षी ने लिहलेल्या ओरिजिनल गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते तर सदाबहार किशोर कुमार यांनी ते गायले होते. किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू कायम ठेवण्यात नवीन गायक अयशस्वी ठरले आहेत.

२ मिनिटाच्या या गाण्यातल्या पहिल्या काही ओळी नवीन लिहल्या असल्या तरी बाकीच्या ओळी जुन्या गाण्यातल्याच पुन्हा वापरल्या आहेत. गौरव-रोशीन ने सुरुवातीच्या कडव्याला पॉप म्युसिकचा रंग चढवला आहे. पहिले कडवे ऐकल्यावर तुमची उत्सुकता वाढते. रिमेक जरी आताच्या काळाशी सुसंगत असले तरी या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या संगीताची तोड नाही.

देव नेगी आणि शुभ्रो गांगुली हे गाण्याचे मुख्य गायक असून अर्पिता चक्रवर्तीने माधुरी दीक्षितला आवाज दिला आहे. नेगी, गांगुली आणि चक्रवर्तीने गाणे ठीकठाक गाईले आहे परंतु गाण्यात किशोर कुमारचा आवाज जोडला असता तर हे गाणे आणखी श्रवणीय झाले असते.

विडिओ बाबत बोलायचं तर माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसतात परंतु राजू वर्गीस यांचे नृत्य दिग्दर्शन मात्र आपली निराशाच करते. गाण्यामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि इतर कलाकारांची पैश्याची हाव दाखवली आहे.

या गाण्यासाठी जोशपूर्ण कोरिओग्राफीची गरज होती, पण इथे सर्वच कलाकारांमध्ये ऊर्जा वाटत नाही. निळा पोशाख आणि निऑन लाईट्सचा देखील गाण्यावर काही सकारात्मक फरक पडत नाही.

हे रिमिक्स गाणे पॉप संगीताच्या शौकिनांच्या सुद्धा पसंतीस पडणार नाही.

टोटल धमाल २२ फेब्रुवारी ला रिलीज होणार आहे. दोन्ही गाणी खाली पहा.

 

Related topics

Song review