Article English Hindi

एटनबरो दिग्दर्शित गांधी (१९८२) मध्ये कस्तुरबाची भूमिका करण्यासाठी रोहिणी हट्टंगडीने आपले वजन कसे कमी केले


चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर डॉली ठाकोर यांनी बेन किंग्सलेने भूमिकेसाठी केलेली तयारी आणि सेट वर २  मिनटे उशिरा आल्याने डॉलीच्या पतीला दिग्दर्शकाकडून खावा लागलेला ओरडा या सर्व आठवणींना उजाळा दिला.

Keyur Seta

सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत राजकीय जीवनपटांचा दौर आहे. यामधले किती जीवनपट प्रेक्षकांच्या ध्यानात राहतील हा प्रश्नच आहे. परंतु एक जीवनपट आहे जो अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि तो म्हणजे महात्मा गांधीच्या आयुष्यावर आधारित रिचर्ड एटनबरो दिग्दर्शित गांधी (१९८२).

उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट कथाकथन साठी हा चित्रपट सगळीकडे नावाजला जातो परंतु चित्रपट निर्मितीमध्ये फिल्ममेकर्सना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे प्रेक्षकांना ठाऊक नसते.

चित्रपट निर्मितीमधले एक कठीण कार्य म्हणजे योग्य कलाकारांची निवड. आणि हे अत्यंत महत्वपूर्ण कठीण काम तडीस नेण्याची जबाबदारी होती दूरदर्शन वार्ताहर आणि थेटर अभिनेत्री डॉली ठाकोर यांच्यावर.

त्यांना चित्रपटासाठी ४९८ भारतीय कलाकारांची निवड करायची होती. दिग्गज नाटककार ठाकोर आता कास्टिंग डायरेक्टर, सामाजिक कार्यकर्त्या आणि पी आर कंपनीच्या हेड आहेत, पण १९८० मध्ये जेव्हा एटनबरोने त्यांच्यावर कास्टिंगची जबाबदारी टाकली तेव्हा त्यांनी कधीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले नव्हते.

डॉली ठाकोर 

गेल्या महिन्यात लोणावळा मध्ये संपन्न झालेल्या लिफ्ट (एल आय एफ एफ टी) या चित्रपट महोत्सवात त्यांनी गांधी चित्रपटाच्या कास्टिंगवेळी घडलेल्या काही दिलचस्प गोष्टी सांगितल्या. गांधी चित्रपटाला एकूण ८ ऑस्कर मिळाले होते. उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट वेशभूषा (भारतीय व्यक्तीला भेटलेला पहिला ऑस्कर — भानू अथैया) हे तयापैकीच काही.

"मला कास्टिंग बद्दल सर्व काही या चित्रपटामुळेच कळाले. मला शूटिंगचे काहीच ज्ञान नव्हते. मला हिंदी चित्रपटांमधलं ते झाडांमागून पळणे आणि पावसात भिजून साडी ओली होणे या सारख्या ज्या गोष्टी होत्या त्या बिलकुल आवडत नसत," ठाकोर हसत म्हणाल्या. ठाकोर यांनी लंडनला बी बी सी मध्ये रेडिओ आणि टेलिव्हिजन मध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

"एक दिवस अचानक माझी लंडनची मैत्रीण राणी दुबे एटनबरोना घेऊन माझ्या घरी आली. त्या वेळी आमच्या घरात फक्त दोनच गाद्या होत्या. आणि एका गादीवर एटनबरो बसले."

ठाकोर आणि दिग्गज जाहिरातकार व रंगभूमीचे दिग्दर्शक एलीक पदमसी त्यावेळी एकत्रच राहत असत. त्यांच्या घराची एक पूर्ण भिंत पदमसीने केलेल्या नाटकांच्या फोटो फ्रेम्सने सजवलेली होती. ठाकोरने लगेच फोन करून पदमसीना घरी बोलवून घेतले.

त्या घटनेची आठवण काढत ठाकोर म्हणाल्या, "एटनबरो फोटोग्राफ पाहत होते आणि त्याच क्षणी पदमसी आले आणि त्यांना पाहून एटेनबरोने त्यांना जिन्नाच्या भूमिकेसाठी घेण्याचा विचार केला. मग त्यांनी मला विचारले की मी हिंदी कलाकारांच्या कास्टिंगचे काम करू शकेन का?"

एटनबरोंनी इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यासारख्या एका नवख्या व्यक्तीवर कशी सोपवली? यावर त्या म्हणाल्या की मी थेटरमध्ये काम करत असल्याने त्यांनी आमच्या नाटकांचे काही फोटोग्राफ्स पहिले होते आणि ते सर्व ब्रिटिश नाटकं होती आणि तुम्ही नाटकांमध्ये काम केले असेल तर तुम्हाला कोणत्या पात्रासाठी काय गरजेचे आहे याचे ज्ञान असते.

गांधी चित्रपटात महात्मा गांधींच्या तरुणपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत काळ दाखवला आहे. बेन किंग्सलेना त्यांच्या अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. रोहिणी हट्टंगडी यांनी गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधीची भूमिका केली होती.

ठाकोर खूप वर्षांपूर्वी दिल्ली मध्ये असलेल्या ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्व्हिस (बी आय एस) मध्ये कनिष्ठ संपादक म्हणून काम करत होत्या. सुरवातीच्या तीन महिन्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये बी आय एसच्या नावाने आलेले सर्व लेख अधोरेखित करून ठेवायचे काम होते. त्यानंतर फोटोग्राफ्स खाली कॅप्शन देण्याचे काम त्यांना देण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू रिचर्ड एटनबरो आणि मोतीलाल कोठारी यांची भेट हे त्यांनी लिहलेले पहिले कॅप्शन होते. "ही १९६२ ची घटना आहे आणि रिचर्ड त्यावेळी लॉर्ड किंवा सर नव्हते. त्यानंतर कित्येक वर्षांनी रिचर्ड माझ्या घरी येतात," त्या हसत म्हणाल्या.

ठाकोर यांनी ४९८ कलाकारांची कास्टिंग केली, त्यातल्या काही कलाकारांच्या वाट्याला फक्त एक वाक्य असायचे.

ब्रिटिश टीमच्या काम करण्याच्या पद्धतीने ठाकोर चकित झाल्या होत्या. त्यांच्याकडे क्राउड डिरेक्टर आणि लाइन डिरेक्टर सुद्धा होते. "तुम्हाला कलाकारांची निवड करण्यासाठी देशाच्या कोणत्याही भागात जाण्याची मुभा होती. मी कोलकत्याला शेखर बॅनर्जींची निवड केली. मी विक्टर बॅनर्जींची सुद्धा ऑडिशन घेतली होती पण त्यांची निवड होऊ शकली नाही." चित्रपटासाठी  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून सुद्धा अनेक कलाकारांची निवड केली होती.

चित्रपटाची पूर्ण युनिट खूपच प्रोफेशनल होती. एकदा पदमसी काही कारणामुळे फक्त दोन मिनिट लेट झाले तर युनिट त्यांना सोडून पुढे निघून गेले. नंतर ते सईद जाफरी बरोबर त्यांच्या कार मधून सेट वर आले.

जेव्हा त्यांनी विचारले की मी फक्त दोन मिनिटंच उशिरा आलो तर रिचर्ड त्यांना म्हणाले की चित्रपटावर एक मिनिटाला १००० पाउंड खर्च होत आहे आणि म्हणून तुमच्यामुळे आमचे २००० पाउंडचे नुकसान झाले.

रोहिणी हट्टंगडींच्या निवडीची गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे. नाट्यप्रेमी ठाकोर हट्टंगडींना एका नाटकामध्ये पाहतात आणि पाहता क्षणीच रिचर्ड, जे दिल्लीला इंदिरा गांधींना भेटायला आलेले, त्यांना फोन करतात. लगेच रिचर्ड सुद्धा दिल्लीवरून मुंबईला येतात. "हट्टंगडींना पाहता क्षणीच एटनबरो मला म्हणाले की जर हट्टंगडीने १०-१५ किलो वजन कमी केले तर कस्तुरबाच्या भूमिकेसाठी मी त्यांची निवड करेन."

ठाकोर रोहिणी हट्टंगडींना डाएटिशनकडे घेऊन गेल्या. हट्टंगडींना लंच आणि डिनर साठी एक वाटी डाळ आणि दोन चपाती हे कठोर डाएट फॉलो करायला लागले. त्यांना दररोज दीड तास चालणे भाग होते, परंतु त्या स्वतः कधीच चालायला जात नसत. "म्हणून मग मला त्यांच्याबरोबर डॉ विष्णू कक्कडच्या क्लीनिक मध्ये जावे लागे. तिथे हट्टंगडी चालत असत आणि मी एका कोपऱ्यात बसून असे."

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ठाकोर आणि किंग्सले यांच्यात मैत्री झाली. किंग्सलेंनी भूमिकेची तयारी कशी केली या आठवणींना पण ठाकोरनी उजाळा दिला.

"आम्ही त्यांच्या रूममध्ये गांधीजींचे विविध फोटो चिकटवले होते. त्यानंतर किंग्सलेच्या सांगण्यानुसार आम्ही त्यांच्या रूममधून सर्व फर्निचर हटवले. त्यांना पायाची घडी घालून बसायचा आणि जमिनीवर झोपायचा सराव करायचा होता. त्यांना योग आणि चरखा चालवण्याचे शिकवण्यासाठी आम्ही खास काही लोकांना बोलावले. गांधीजींसारखा थोडी मान मागे करून हसणे देखील ते शिकले. काही काळासाठी त्यांनी मांसाहार करणे देखील सोडले."

इंडियामध्ये खूपवेळा लोकं कलाकार आणि त्यांनी पडद्यावर साकारलेले पात्र यामध्ये फरक करू शकत नाहीत आणि त्याचे शिकार एकदा किंग्सले देखील झाले. एकदा त्यांना बिअर पिताना पाहून गांधी बिअर पीत आहेत अश्या बातम्या आल्या.

चित्रपटावर काम करताना ठाकोरना कधीच वाटले नाही की त्या एका क्लासिक चित्रपटाचा भाग आहेत. गांधीजींवर बनलेला हा पहिला चित्रपट होता. "हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे आणि रिचर्ड एटनबरो हे खूप मोठे दिग्दर्शक आहेत, असा आम्ही त्यावेळी विचार करत नव्हतो."

गांधी चित्रपटाला उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन या विभागात सुद्धा ऑस्कर मिळाला होता.

Related topics