{ Page-Title / Story-Title }

News Hindi

माझा मुलगा जुनैद माझ्या जीवनपटात माझी भूमिका करू शकतो – आमिर खान


जुनैदला अभिनय क्षेत्रात लॉन्च करण्यासाठी योग्य चित्रपटाच्या शोधात आहोत, असंही आमिर खान म्हणाले.

Keyur Seta

आमिर खान निर्मित रुबरु रोशनी या टेलिव्हिजन डॉक्युमेंट्री निमित्त बोलताना आमिर खानने त्यांच्या १९८६ साली रीना दत्तशी झालेल्या लग्नाचा किस्सा सांगितला.

त्यांनी सांगतिले की त्यांच्या गुप्त कोर्ट मॅरेजचा खर्च फक्त रु१० होता. आणि त्यावेळी साक्षीदार म्हणून रुबरु रोशनीच्या दिग्दर्शिका स्वाती चक्रवर्ती भटकळ आणि त्यांचे पती व फिल्ममेकर सत्यजित भटकळ होते.

जेव्हा आमिर खानला विचारले की त्यांनी पालकांना कसं मनवलं त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले की "ही खूप लांबलचक गोष्ट आहे, तुम्हाला माझा जीवनपट पाहिल्यावरच ते कळेल".

तेव्हा त्यांना विचारले की त्यांच्या जीवनपटात त्यांची भूमिका कोणी करायला हवी? तर ते म्हणाले, "माहित नाही, कदाचित माझा मुलगा करू शकतो."

आमिर आणि रीना यांचा मुलगा जुनैदचा जन्म १९९३ साली झाला. २००२ ला दोघांचा घटस्फोट झाला, पण आमिरचे अजूनही जुनैदच्या आई रीना दत्तशी मैत्रीचे संबंध आहेत.

आमिर खान पुढे म्हणाले की ते जुनैदला नट म्हणून लॉन्च करण्यासाठी योग्य चित्रपटाच्या शोधात आहेत. "मी त्याचं काम पाहिलं आहे आणि त्याच्या कामाने मी समाधानी आहे. तो एक प्रशिक्षित नट आहे. त्याने लॉस अँजेलिसला अमेरिकन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस् मध्ये दोन वर्षे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर एक वर्ष तिथेच नाटकांमध्ये काम केले. जेव्हा आम्हाला त्याच्या पदार्पणासाठी योग्य अशी कथा मिळेल तेव्हा आम्ही त्याला अभिनय क्षेत्रात लॉन्च करु".

पण आमिर खान स्क्रीन टेस्ट बाबत मात्र आग्रही आहेत. "त्याला स्क्रीन टेस्ट पास करावी लागेल, जर तो स्क्रीन टेस्ट मध्ये पास झाला तरच तो चित्रपटात काम करेल अन्यथा नाही. चित्रपटात तुम्ही एक पात्र असता, हिरो नाही. आणि दोघांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ दिल है के मानता नही (१९९१) मध्ये मी रघु जेटली होतो तर जो जीता वही सिकंदर (१९९२) मध्ये मी संजय लाल, लगान (२००१) मध्ये भुवन आणि रंग दे बसंती (२००६) मध्ये डीजे होतो."

आमिर खानच्या मते जुनैदने इतक्यात मीडियाशी बोलू नये. "मला वाटते की त्याला अगोदर काम करायचे आहे. मीडियाशी बोलण्याचा हक्क त्याने कमवायला हवा असे मला वाटते. आणि त्याने अजून तो कमवला नाही."

Related topics