संदीप मोदी यांच्या चुंबक ने उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला तर सुमित्रा भावेंना दिठी चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ मध्ये चुंबक, दिठी सिनेमांनी मारली पुरस्कारांवर बाजी
Mumbai - 18 Jan 2019 22:51 IST


Suparna Thombare
१७व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. ज्युरी मेम्बर्स कमलेश पांडे, प्रस्सना विठणगे, ख्रिस्तर हॉम्ग्रेन, डॅनियल किँचिओ, शबनम गोळीखानी यांनी मराठी आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही कॅटेगरीतल्या विजेत्यांची नावे घोषित करून महोत्सवाची सांगता केली.
मराठी विभागामध्ये चुंबक आणि दिठी यांना प्रत्येकी तीन पुरस्कार मिळाले.
स्वानंद किरकिरे यांना त्यांच्या चुंबक (२०१८) चित्रपटातील मतिमंद व्यक्तीच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चुंबकला उत्कृष्ट चित्रपटाचा देखील पुरस्कार मिळाला. तर संदीप मोदी आणि सौरभ भावे यांना चुंबकसाठीच उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.
देविका दफ्तरदार यांना त्यांच्या नाळ (२०१८) चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सुमित्रा भावेंना दिठी या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट हा प्रेक्षक पसंती पुरस्कारसुद्धा मिळाला. तसेच धनंजय कुलकर्णींना दीठीसाठीच उत्कृष्ट छायाचित्रण हा पुरस्कारदेखील मिळाला.
आंतराष्ट्रीय विभागात इवा हुसोन यांचा फ्रेंच कुर्दिश चित्रपट गर्ल्स ऑफ द सन (ले फिलेल दु सोले) ने उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान पटकावला. कॅनेडिअन-क्युबन चित्रपट अ ट्रान्सलेटर साठी रॉड्रिगो बारिऊसो आणि सेबास्टियन बारिऊसो यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.