News Marathi

बाबू बँड बाजा नंतर नशीबवान हा माझा पहिलाच चित्रपट आहे जो प्रेक्षकांपर्यंत पोहचेल – मिताली जगताप


एकाच पद्धतीच्या भूमिका त्यांच्या वाट्याला येत असत असे राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मिताली जगताप यांनी म्हटले.

Keyur Seta

बाबू बँड बाजा (२०१२) ह्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कर मिळाल्यानंतर त्यांच्या करिअरला भरारी मिळाली परंतु त्या चित्रपटानंतर त्यांची एकही भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकली नाही.

सिनेस्तान शी बोलताना मिताली जगताप म्हणाल्या, "बाबू बँड बाजा नंतर हा माझा पहिलाच चित्रपट असावा जो प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे. मी औरंगाबादवरून मुंबईला याच साठी आले होते की प्रेक्षकांना माझे काम पाहून अभिमान वाटेल."

स्टिरिओटायपिंग चा शिकार झाल्याचे मान्य करत त्या म्हणाल्या की "मला नेहमीच गरीब गृहिणीच्याच भूमिका ऑफर केल्या जात होत्या आणि त्या भूमिकांना मी नकार देत असे".

ह्या चित्रपटात सुद्धा त्या एका गृहिणीची भूमिका करत असल्या तरी ही भूमिका फारच वेगळी आहे. "कथेनुसार ह्या पात्रामध्ये जो बदल होतो तो फारच इंटरेस्टिंग आहे आणि मी ह्या टाईपची भूमिका या अगोदर कधीच केली नाही.

"मी यात बबन (भाऊ कदम) ची पत्नी गीताची भूमिका केली आहे. ती एक साधी गृहिणी आणि आई आहे, आपल्या कुटुंबाचा आनंद हीच तिची एकमेव इच्छा आहे. पण जेव्हा तिच्या कुटुंबावर संकट कोसळते तेव्हा कुटुंबाला वाचवण्यासाठी ती सामान्य स्त्री एक असामान्य निर्णय घेते."

जगताप पुढे म्हणाल्या की "कोणतीही भूमिका स्वीकारताना भूमिकेच्या लांबीपेक्षा त्या भूमिकेचे कथानकात किती महत्व आहे याचा मी विचार करते. काहीतरी नवीन करण्यास मी नेहमीच उत्सुक असते".

त्या म्हणाल्या की बाबू बँड बाजा नंतर त्यांनी दरवर्षी एकतरी चित्रपटात नक्कीच काम केले परंतु त्यातले किती चित्रपट रिलीज झाले हे ठाऊक नाही. "कधीकधी मला इतर लोकांकडून काळत असे की माझा चित्रपट रिलीज देखील झाला आहे."

ह्या चित्रपटामुळे त्यांचा अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहचेल याचा त्यांना आनंद आहेच, परंतु "बॉक्स ऑफिस वरील यशापेक्षा माझे काम पाहण्याची इच्छा असणाऱ्यांपर्यंत चित्रपट पोहचू दे असे मला वाटते".

नशीबवान ११ जानेवारी ला रिलीज होईल.

Related topics