News Urdu

पुलवामा आतंकवादी हमल्यामुळे हमीद चित्रपटाची रिलीज पुढे ढकलली आहे


चित्रपटात एका सेंट्रल रिजर्व्ह पोलीस फोर्स (सी आर पी एफ) सैनिक आणि आठ वर्षाच्या काश्मीरी मुलाच्या मैत्रीची गोष्ट सांगितली आहे.

Suparna Thombare

पुलवामा आतंकवादी हमल्यानंतर हमीद चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. चित्रपटात काश्मीरमधला संघर्ष एका ८ वर्षाच्या मुलाच्या नजरेतून दाखवलेला आहे.

तल्हा अर्शद रेशी याने त्या लहान मुलाची तर विकास कुमार यांनी सी आर पी एफ जवानाची भूमिका केली आहे. एजाज खान दिग्दर्शित हा चित्रपट १ मार्च ला रिलीज होणार होता. निर्मात्यांनी अजून रिलीजसाठी नवीन तारीख ठरवलेली नाही.

दिग्दर्शकांनी एका विधानात म्हटले की  "ही ८ वर्षाच्या हमीदची आणि सी आर पी एफ जवानाच्या मैत्रीची गोष्ट आहे. काश्मिरी लोकांमध्ये जी एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे तीच काश्मीर खोऱ्यांमध्ये होणाऱ्या घटनांमागचे खरे कारण आहे आणि ही एकटं पडल्याची भावना दूर करण्यासाठीच हा चित्रपट बनवला होता.

"पण आता आम्हाला वाटते की शांततेचे सर्व प्रयत्न आणि आपले जवान यांचे सीमेवरील कार्य याला योग्य प्रतिसाद मिळत नाही आहे."

योडली प्रोडक्शन निर्मित हमीद ही काश्मीरच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाची गोष्ट आहे. चित्रपटात रसिका दुग्गल आणि सुमित कौल यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

योडली प्रोडक्शन यांनी सी आर पी एफ च्या जवानांसाठी मंगळवारी श्रीनगरमध्ये खास स्क्रिनिंग आयोजित करण्याचे ठरवले होते परंतु या दुःखद घटनेच्या वेळी चित्रपट रिलीज करणे अयोग्य आहे असे निर्मात्यांना वाटते.

सारेगम च्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन डिव्हिजन चे उपाध्यक्ष आणि योडली फिल्म्स मध्ये निर्माते म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ आनंद कुमार म्हणाले, "पुलवामा येते सी आर पी एफ च्या तुकडीवर झालेला आतंकवादी हमला ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. अजिबात माणुसकी नसलेली माणसेच असं कृत्य करू शकतात.

"आम्ही योडली फिल्म्स कडून या हमल्यात आपला जीव गमावलेल्या सर्व सैनिकांच्या कुटुंबाच्या दुःखात शामिल आहोत.

सिद्धार्थ आनंद कुमार म्हणाले की "हमीद विपरीत परीस्ठीतीमध्ये पण शांततेचा संदेश देतो. आपण सर्व देशवासीय आता हा चित्रपट पाहण्याच्या आणि त्याच्या मागचा अर्थ समजून घेण्याच्या मनःस्थितीत नाही त्यामुळे आम्ही चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. चित्रपटाची रिलीजची तारीख लवकरच ठरवण्यात येईल."

गुरुवारी एका सुसाईड बॉमर ने विस्फोटकांनी भरलेली एस यू वी गाडी सी आर पी एफ च्या बसवर आदळून स्फोट घडवून आणला. ही घटना श्रीनगर-जम्मू च्या हायवेवर असलेल्या पुलवामा जिल्ह्यात घडली. शुक्रवारपर्यंत मृतांची संख्या ४९ पर्यंत पोहोचली होती.

Related topics