News Marathi

रमेश भाटकर आताच्या काळात हिरो असायला हवे होते – वर्षा उसगावकर

Read in: English


वर्षा उसगावकरांनी रमेश भाटकरांना आदरांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Keyur Seta

चित्रपट, नाटक आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे रमेश भाटकरांनी ४ फेब्रुवारी ला आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. सोमवारी मुंबईत पार पडलेल्या शोकसभेत मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही आणि नाट्यक्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.

भाटकरांनी ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकरांबरोबर काही चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. भाटकरांची आठवण काढताना वर्षा उसगावकर भावुक झाल्या.

"ते खूप मोठ्या मनाचे व्यक्ती होते. त्यांना कोणाची प्रशंसा करायची असेल तर ते अगदी मोकळ्या मनाने त्या व्यक्तीची प्रशंसा करत, अगदी माझी सुद्धा अगदी मोकळ्या मनाने प्रशंसा करत असत. ते जरी कलाकार असले तरी ते सर्वात अगोदर एक श्रोते होते. त्यांना कधी माझा टीव्ही वरचा परफॉर्मन्स अथवा कोण्या चित्रपटातील अभिनय आवडला तर जे आवर्जून मला फोने करत," असं उसगावकर म्हणाल्या.

उसगावकरांच्या मते भाटकरांचे व्यक्तीमत्व हे मिल्स आणि बून चित्रपटातील हिरो सारखे अगदी काळाच्या पुढचे होते. "माझ्या मते मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात अशा पद्धतीच्या हिरोची आवश्यकता नव्हती. जर का भाटकर आताच्या काळात हिरो म्हणून आले असते तर त्यांच्या कारकिर्दीने एक वेगळीच उंची गाठली असती. त्यांची एक फॅन म्हणून मला असे वाटते," उसगावकर म्हणाल्या.

भाटकरांनी १०० पेक्षा अधिक चित्रपट, ३० टीव्ही शो आणि ५५ नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट हा नुकताच रिलीज झालेला हिंदी चित्रपट द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर आहे. या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणची भूमिका केली होती.

उसगावकरांनी पैसा पैसा पैसा (१९९३) चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटात भाटकरांची खलनायकाची भूमिका आहे जो खरंतर चित्रपटाचा नायक असतो. त्यांच्या मते भाटकरांच्या अभिनयाची जितकी स्तुती व्हायला हवी होती तेवढी झाली नाही. "त्यांनी त्यांचे पात्र खूपच उत्कृष्ट निभावले होते, म्हणून भाटकरांना त्या वर्षी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळायला हवा होता. पण दुर्दैवाने चित्रपट जास्त चालला नाही, त्यामुळे त्यांचे हे पात्र जास्त लोकांपर्यंत पोचले नाही."

भाटकरांच्या लोकप्रिय चित्रपटां पैकी एक आहे माहेरची साडी (१९९१). या चित्रपटात अलका कुबल, विक्रम गोखले, विजय चव्हाण, अजिंक्य देव, किशोरी शहाणे असे काही कलाकार होते. चित्रपटाचे दिदर्शक विजय कोंडके त्यावेळी अगदी नवखे होते. माहेरची साडी हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट होता. त्यांनी देखील शोकसभे मध्ये चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.

"माझ्या पहिल्याच चित्रपटात इतकी मोठी नावं होती परंतू भाटकर आणि गोखले या दोघांनी मला सांभाळून घेतले. इतक्या मोठ्या कलाकारां सोबत माझा पहिला चित्रपट शूट करणे मला तसे कठीणच होते. चित्रपटाच्या यशामध्ये रमेश भाटकारांचा मोठा वाटा आहे. त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा, त्यांना मी अतिशय गंभीर झालेलं कधी पहिलेच नाही,".कोंडके म्हणाले.

शोकसभेला विजू खोटे, शुभा खोटे व अमोल कोल्हे सुद्धा उपस्थति होते.

Related topics