{ Page-Title / Story-Title }

Interview Marathi

मी कागरमध्ये रिंकू राजगुरूचा राजकीय गुरु आहे – शशांक शेंडे


शशांक शेंडे व दिग्दर्शक मकरंद माने हे कागरचे लाइन प्रोड्युसर सुद्धा आहेत.

Keyur Seta

ख्वाडा (२०१५), रिंगण (२०१७) आणि रेडु (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये शशांक शेंडेंनी खेड्यातल्या व्यक्तीच्या भूमिका केल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित कागरमध्ये सुद्धा शशांक शेंडे अशीच गावाकडची पार्श्वभूमी असलेले पात्र साकारत असले तरी यात एक ट्विस्ट आहे. या चित्रपटात शेंडे रिंकू राजगुरू यांच्या राजकीय गुरुची भूमिका साकारत आहेत.

सिनेस्तान.कॉम शी खास बातचीत करताना शेंडेंनी सांगितले की कागर मध्ये आपल्याला त्यांचा एकदम वेगळा लुक पाहायला मिळेल. "वाढलेली दाढी, लांब केस आणि एकाच प्रकारची धोती असा माझा काही चित्रपटांमधील लुक पाहून मकरंद मानेला कंटाळा आला म्हणूनच कदाचित या चित्रपटात त्याने मला खूप वेगळ्या रूपात आणि पेहरावात प्रेक्षकांसमोर आणायचा प्रयत्न केला आहे. या लुकमध्ये मला दाढी सुद्धा नाही आणि डोक्यावर पण कमी केस आहेत," असं शेंडे म्हणाले.

रिंगण (२०१७) आणि यन्ग्राड (२०१८) नंतर मानेंचा हा तिसरा चित्रपट आहे. आणि या तिन्ही चित्रपटांमध्ये शशांक शेंडे यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

"मकरंद बरोबर हा माझा तिसरा चित्रपट आहे. रिंगण नंतरच आम्ही ठरवलं होतं की आम्ही एकत्र काम करत राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की मी मकरंदच्या प्रत्येक चित्रपटात दिसेन. जर स्क्रिप्ट चांगली असेल तर मी त्याच्या चित्रपटात फक्त एक सीन करायला सुद्धा तयार आहे.

"यन्ग्राड नंतर आम्ही दोघांनी एकत्र येऊन आमचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस बहुरूपी सुरु करायचे ठरावले. आम्ही या चित्रपटाचे लाइन प्रोड्युसर आहोत. सतत वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही चर्चा करत असतो."

कागर मध्ये रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे 

शेंडे म्हणाले की ते कोणत्याही गोष्टीवर लगेच घाबरतात आणि त्यांच्या उलट माने नेहमीच शांत असतात आणि यावर त्यांनी एक किस्सा सांगितला. चित्रपटात एक कलाकार एका रंगचे लेन्सेस घालून शूट करत होता, परंतु एक दिवस शूटिंग करताना तो लेन्स घालयचेच विसरला. "व्हॅनिटी वन मध्ये येऊन जेव्हा त्याने आम्हाला हे सांगितलं तेव्हा आम्ही घाबरलो आणि थोड्या वेळासाठी माने सुद्धा चिंतीत झाला परंतु त्याने लगेच सांगितले की आपण हा सीन पुन्हा शूट करू. तो इतका शांत व्यक्ती आहे," शेंडे म्हणाले.

भूमिकेच्या तयारीसाठी ते काय करतात असे विचारले असता शेंडे म्हणाले की ते जास्त मेहनत घेत नाहीत. त्यांची फक्त स्क्रिप्ट लवकरात लवकर मिळावी एवढीच इच्छा असते. "कोणी माझ्या हातात स्क्रिप्ट दिली आणि लगेच अभिनय करायला सांगितले तर मला ते जमणार नाही. पण जर मला १ महिन्या अगोदर स्क्रिप्ट मिळाली तर मी ती १००-१२५ वेळा वाचू शकतो. तेव्हाच मला स्क्रिप्टमधल्या छोट्या छोट्या गोष्टी समजतात. जसे एखादे पात्र संवाद बोलताना त्याचा चष्मा काढून साफ करेल का?" शेंडे म्हणाले.

पण स्क्रिप्ट लिहिताना त्यांचा देखील सहभाग असेल तर त्यांना अधिक आवडते. "ख्वाडा, रिंगण, रेडु यांसारख्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहण्याच्या प्रोसेस मध्ये सुद्धा माझा सहभाग होता."

कागरमध्ये रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहेत. शुभंकर तावडे एका उभरत्या राजकीय नेत्याची भूमिका साकारत आहेत ज्याला रिंकू राजगुरूच्या पात्राची मदत घ्यावी लागते. यामध्ये शेंडे रिंकूच्या पात्राला मदत करताना दिसतात.

शेंडे यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. आता त्यांना नाटकात काम करायला भेटत नाही पण त्यांना नाटकाची आठवण पण येत नाही. "मी २० वर्षे प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं. पैसे जास्त मिळत नसत पण आत्मिक समाधान मिळायचे. मी, सोनाली कुलकर्णी, निखिल रत्नपारखी,अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, किरण यद्नोपवित, आम्हा सर्वांचा मिळून एक समन्वय नावाचा ग्रुप होता. आम्ही सर्व मिळून खर्च उचलायचो. पण काही काळाने कंटाळा येणे साहजिक आहे."

माने आणि शेंडे एकत्र चित्रपट रिलीज करण्याच्या विचारात होते पण त्यांना कोणीतरी वायकॉम१८ मोशन पिक्चर्स च्या निखिल सानेंना भेटायचा सल्ला दिला. "साने ने चित्रपट पाहताच चित्रपट रिलीज करण्यास तयार झाले. त्यामुळे आमचे टेन्शन कमी झाले. म्हणूनच आता आम्ही कोणतेही टेन्शन न घेता तुमच्याशी गप्पा मारू शकतो," शेंडे हसत म्हणाले.

Related topics